पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे सातारा बायपास रस्त्यावर एका भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत महिलेचा जागिच मृत्यू झाला. महिला रस्ता क्रॉस करत असताना कंटेनरने त्यांना धडक दिली. हा प्रकार रविवारी घडला आहे.
कविता रेऊजी फडतरे (वय 38, रा. वारजे माळवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक पसार झाला आहे. याबाबत पोलीस शिपाई अजित कोकरे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता या वारजे येथील भोपळे चौकात राहतात. दरम्यान त्या काल दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा बायपास रस्त्यावरील हॉटेल मराठे शाईसमोर रस्ता क्रॉस करत होत्या. यावेळी त्यांना पुण्याकडून सताऱ्याकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरात धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच कंटेनर चालक तेथून पसार झाला. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक देशमुख हे करत आहेत.