पुणेः बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या स्वारगेट ते कात्रज चौक या (Swargate to Katraj Chowk) बीआरटी (BRT) मार्गातील बहुतांशी त्रुटी दूर झाल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर पीएमपीकडून (PMP) नववर्षाचे मुहुर्त साधत शुक्रवार (दि. 1) पासून बससेवा सुरु करण्यात आली आहे. आता स्वारगेट ते कात्रज चौक (Swargate to Katraj Chowk) हे सुमारे 6 किलोमीटरचे अंतर 15 ते 18 मिनिटांमध्ये गाठणे शक्य होणार आहे. यापूर्वी हेच अंतर पार करण्यासाठी 30 ते 35 मिनिटांचा कालावधी लागत होता.
दोन दिवसांपूर्वीच या बीआरटी मार्गाची पाहणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांच्या केली होती. तसेच या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला होता. कामाच्या पाहणीनंतर महापौरांनी एक जानेवारीपासून बीआरटी सेवा सुरू करण्याची घोषणा केली. त्यानुसार गेल्या तीन दिवसांमध्ये या मार्गावरील सर्व अडचणी आणि त्रुटी प्रशासनाने दूर केल्या आहेत. यापूर्वी स्वारगेट ते कात्रज चौक हे 6 किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी सुमारे 30 ते 35 मिनिटांचा कालावधी लागत होता. आता बससाठी स्वतंत्र मार्ग असल्यामुळे हे अंतर आता 15 ते 18 मिनिटांमध्ये गाठणे शक्य होणार आहे. या मार्गावर एकूण 206 बसचे नियोजन पीएमपीकडून करण्यात आले आहे. त्यामुळे दोन मिनिटाला एक बस सोडण्यात येणार असल्याचे पीएमपीकडून सांगण्यात आले.
या मार्गाच्या कामाची निविदा चार वर्षांपूर्वी काढली होती. मात्र तांत्रिक अडचणी आल्याने 2018 साली नव्याने ही प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र आचारसंहिता आणि या रस्त्यावरील प्रमुख दोन उड्डाणपुलांची कामांमुळे बीआरटीच्या कामाला विलंब झाला. आता यातील बहुतांश त्रुटी दूर झाल्या असून वाहतुकीसाठी हा मार्ग खुला करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे पीएमपीचे अधिकारी दत्तात्रेय झेंडे यांनी सांगितले.