बहुजननामा ऑनलाईन – शहरात विविध भागातून वाहन चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. रवी जितेंद्र सरोदे (वय 30, रा. गणेश पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
शहरात दुचाकी चोऱ्या व घरफोड्या काही केल्या तरी थांबत नसल्याचे दिसत आहे. त्याअनुषंगाने स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांना गस्त घालत सराईत चोरट्यांवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी समर्थ पोलीस नाना पेठेत गस्त घालत होते. यावेळी कर्मचारी सुमित खुट्टे यांना उतारा चौक येथे एकाची संशयास्पद हालचाल दिसून आली. त्यामुळे त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असता त्याने रवी असे सांगितले. तसेच त्याच्याजवळ असणाऱ्या दुचाकीबाबत उडवा उडवीचे उत्तरे देत होता. त्याला ताब्यात घेऊन सखोल तपास करण्यात आला. यावेळी त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी 4 दुचाकी जप्त केल्या आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रभाकर कापुरे, कर्मचारी सुमित खुट्टे, सचिन पवार, निलेश साबळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.