पुणे : बहुजननामा ऑनलाईन – नामांकित कंपनीत काम करणाऱ्या एकाने कंपनीची माहिती चोरून त्याद्वारे पत्नीच्या नावे दुसऱ्या कंपन्या सुरुकरून ग्राहकांना माल पुरवत आर्थिक फसवणूक केली. तर कंपनीचा विश्वास घात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, त्याने 35 ते 50 लाखांचा अपहार केला आहे. याप्रकरणी प्रवीण पुरुषोत्तम शेंडे (रा. शिवाजीनगर) याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार पसार झाला आहे. याबाबत सुनील चांदोरकर (वय 47, रा. सिहगड रोड) यांनी सिहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची त्रिमूर्ती स्टेनलिंक इक्विपमेन्ट्स प्रा. लिमिटेड ही कंपनी आहे. त्यांच्या कंपनीकडून ग्राहकांनी मागितल्यानंतर त्या वस्तूंचा पुरवठा केला जातो. तर आरोपी हा या कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरी करत होता. यावेळी आरोपीसोबत कंपनीची गोपनीय व महत्वाची माहिती उघड न करण्याचा करार केला होता. मात्र त्याने या कराराचा भंग केला आणि पत्नीच्या नावाने एस. एम. इंजिनिअर्स ट्रेडर्स व श्रीमीरा ट्रान्सपोर्ट या कंपन्या स्थापन केल्या.
त्यानंतर फिर्यादी यांच्याच ग्राहकांनी वस्तूंची मागणी केल्यानंतर त्यांना पत्नीच्या कंपनीद्वारे कमी किमतीत प्रपोझल देऊन त्यांना माल पुरवला. तर कंपनीच्या मेल आयडीवरून स्वतःच्या मेल आयडीवर माहिती घेऊन त्यांचा विश्वासघात करत 35 ते 50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अंकुश कर्चे हे करत आहेत.