बहुजननामा ऑनलाइन टीम – औरंगाबाद जिल्हयातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव(MLA Harshvardhan Jadhav) यांना चतुःश्रृंगी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात आज (मंगळवार) अटक केली आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात हर्षवर्धन जाधव आणि इषा झा यांच्याविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जाधव यांच्याविरूध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आज सर्वप्रथम पोलीसनामा ऑनलाइनने दिले होते. जाधव यांना अटक केल्याबाबतची माहिती चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिली. जाधव यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दाखल गुन्हयाबाबत थोडक्यात –
माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या सोबत असणार्या इषा झा यांच्याविरूध्द पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात भादंवि 307, 325, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याप्रकरणी अमन अजय चड्डा (28, रा. भाऊ पाटील रोड, पुणे. आयटी पार्क समोर, बापोडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हर्षवर्धन रायभान जाधव (43, रा. बालेवाडी, पुणे) आणि इषा बालाकांत झा (37, रा. वाकड) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि.14) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी चड्डा यांचे आई आणि वडिल हे दुचाकीवरून औंध येथून ब्रेमन चौकाकडे जाणार्या रोडवरून संघवी नगरकडे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या चारचाकी गाडीचा दरवाजा अचानकपणे उघडला. त्यामुळे अपघात झाला. त्याबाबत चड्डा यांच्या वडिलांनी हर्षवर्धन जाधव यांना जाबव विचारला. चड्डा यांच्या वडिलांनी त्यांचे हार्टचे ऑपरेशन झाले आहे हे देखील जाधव यांना सांगितले. त्यानंतर देखील आरोपींनी संगणमत करून चड्डा यांच्या आई आणि वडिलांना छातीमध्ये तसेच पोटामध्ये लाथा मारल्या. आरोपींनी चड्डा यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने लाथा मारून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा केला. त्यामुळे त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इषा झा यांना अटक करण्यात आलेली नाही. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दहिफळे करीत आहेत.