पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांना दोन अनोळखी व्यक्तींनी क्राईम ब्रॅन्चचे पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच तुम्ही गांजा विक्री करता असे म्हणून त्यांची झडती घेण्याच्या बहाण्याने 33 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार पिंपरी पुलाजवळ असलेल्या नेपाळी मार्केट (Nepali Market Pimpri) जवळ घडला आहे.
याबाबत सोहेल गुलफाम खान (वय-23 रा. तुळजाई कॉलनी, थेरगाव, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन दोन अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 420, 170 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र अखिलेश कुवार व जमशेद खान हे रिक्षाने पिंपरी पुलाजवळ कपडे करण्यासाठी गेले होते. नेपाळी मार्केट जवळ दुचाकीवरुन दोनजण त्यांच्याजवळ आले.
दुचाकीस्वारांनी आम्ही क्राईम ब्रॅन्चचे पोलीस असल्याची बतावणी केली. तुमच्याकडे गांजा आहे, तुम्ही गांजाची विक्री करता, तुमच्या खिशात गांजा आहे, तुमच्या खिशातील सर्व साहित्य बाहेर काढा असे आरोपींनी सांगितले. घाबरलेल्या तरुणांनी खिशातील सर्व साहित्य बाहेर काढले. त्यामध्ये फिर्य़ादी यांच्याकडे 13 हजार रुपये, आधार कार्ड व पॅन कार्ड तसेच अखिलेश व जमशेद यांच्याकडील प्रत्येकी दहा हजार रुपये असे एकूण 33 हजार रुपये घेत आरोपी तिथून पसार झाले. मात्र ते पोलीस नसून त्यांनी आपली फसवणूक केली आहे हे लक्षात आल्यानंतर सोहेल खान यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर करत आहेत.