बहुजननामा ऑनलाइन – बाणेर भागातील जमिनीच्या वादातून पायी चालत येऊन एकाने पिस्तूल काढत फुटपाथवर उभारलेल्या बिल्डरवर गोळी झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना पुणे पोलीस आयुक्तालयाच्या काही अंतरावर घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान शहरात एका दिवसातील हा दुसरा खून आहे.
राजेश हरिदास कानाबारा (वय ६३, रा. सोपानबाग, घोरपडी ) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश हे इमारत सुशोभिकरणाचे व्यावसायिक होते. त्यांचे बावधन येथील १० एकर जागेसंदर्भात काहीजणांशी वाद सुरु होते. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू आहे. आज दुपारी त्याची सुनावणी होती. यामुळे राजेश अपर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीसाठी आले होते.
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते. यामुळे त्यांनी त्यांची कार आयुक्ताल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एसीआय बँकेच्या कॉर्नरला उभी केली होती. चालक कारमध्ये होता. सुनावणीनंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर येउन पायी रस्त्याने कारकडे चालत आले. ते कारमध्ये बसण्यासाठी उभा असतानाच शासकीय कोषागारजवळ चालत आलेल्या हल्लेखोऱ्याने त्यांच्यावर जवळून गोळी झाडली. गोळी त्यांच्या छातीत लागल्याने रक्तस्त्राव होऊन गंभीर जखमी झाले. त्यांना चालकाने तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. पण त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. माहितीनुसार दोन हल्लेखोर असण्याची शक्यता आहे. गोळीबार केल्यानंतर तो पळत गेला. तो नंतर दुचाकीवरुन गेला असल्याची माहिती आहे.
माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस व गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे यांनी धाव घेतली होती.
जागेसंदर्भातील वादामुळे हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तातडीने तपास सुरु करण्यात आला आहे. त्याशिवाय सीसीटीव्ही फूटेजव्दारे हल्लेखोरांचा माग काढला जात आहे.