बहुजननामा ऑनलाइन टीम – ऐतिहासिक लाल महालात दुरुस्तीची कामे सुरू असली तरी लवकरच तो सर्वांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. दुरूस्तीच्या नावाखाली बंद ठेवलेला लाल महाल त्वरीत सर्वांसाठी खुला करावा अन्यथा संघर्ष करावा लागेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने महापालिका प्रशासनाला दिला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने तो खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे लाल महाल जाणीवपूर्वक बंद ठेवला आहे, असा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. 1) पालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, अधिका-यासमवेत चर्चा केली. राज्यातून शेकडो पर्यटक येथे येतात, मात्र त्यांना प्रवेशद्वारावरून परत पाठविले जाते. लाल महाल एखाद्या समारंभासाठी खुला केला जातो. परंतु त्यासाठी शिवप्रेमींना प्रशासनाशी वाद घालावा लागतो.
येथील दुरुस्तीची कामे लवकर पूर्ण करावीत. लाल महालात स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसले यांचा पुतळा बसवावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, चंद्रशेखर घाडगे, सारिका जगताप, मंदार बहिरट, विनायक घुले आदी उपस्थित होते.