पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सूरज ठोंबरे टोळीवर मोक्का लावल्यानंतर पसार झालेल्या समर्थ परिसरातील अवैध धंद्याचा बादशाह अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. समर्थ पोलिसांनी शिरवळमध्ये अटक केली आहे. आंदेकर टोळीतील सराईतावर खुनी हल्ला केला होता.
सोमनाथ सयाजी गायकवाड (वय 36, रा. अशोक चौक, नाना पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
सोमनाथ गायकवाडवर खुनाचे दोन, गोळीबार, मारामारी, खंडणी असे एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. आंदेकर टोळीतील काहीजणांबरोबर वाद झाल्याने सूरज ठोंबरे, सोमनाथ गायकवाड यांनी स्वत:ची टोळी सुरू केली होती. त्यांनी व्यापारी पेठेत दहशत निर्माण केली. तसेच आंदेकर टोळीतील गुंडांवर हल्ले सुरू केले होते. यानंतर नुकतीच एका गुन्ह्यात या सर्वांवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.
ठोंबरे टोळीवर मोक्कानुसार (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) करण्यात आल्यानंतर गायकवाड पसार झाला होता. गायकवाड शिरवळ एसटी स्थानक परिसरात थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली होती. त्यानुसार हवालदार योगेश जगताप यांनी तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर त्याला शिरवळ भागात सापळा लावून पकडले.
गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, अजय थोरात, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, योगेश जगताप, महेश बामगुडे, शशीकांत दरेकर, मीना पिंजण, रूक्साना सय्यद यांनी ही कारवाई केली आहे.