पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याची धमकी देत शहरातील एका बड्या इलेक्ट्रॉनीक्स कंपनीच्या मालकाकडून 20 लाखाची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने एकाच वेळी 50 लाख रुपये देऊन विषय संपवा असे सांगत त्यांच्याकडून दोन लाखाची खंडणी घेताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक केली. ही कारवाई सिंहगड रोडवरील एका हॉटेलात करण्यात आली. अटक करण्यात आलेला आरोपी हा गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अविनाश वसंत जाधव (वय-28, रा. चन्द्राई संकल्प फ्लॅट नंबर २०६ दत्तनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांची इलेक्ट्रॉनीक्स कंपनी आहे. या कंपनीत इलेक्ट्रॉनीक्स वस्तू बनवून त्याची होलसेल विक्री केली जाते. दरम्यान तक्रारदार यांच्या कंपनीत एक तरुणी नोकरी करीत होती. पण तिने 2017 मध्ये येथील नोकरी सोडली. त्यानंतर तिचा विवाह आरोपी सोबत झाला. मात्र काही दिवसांनी आरोपीला पत्नीचे या कंपनी मालकाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आला.
त्याने परस्पर तक्रारदार यांना भेटून तुमचे अनैतिक संबंध मला माहित असून, तुमच्या घरी मी ही माहिती देतो, अशी भीती दिली. तसेच त्यांना पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने तक्रारदार यांच्याकडून 2017 ते 2020 या कालावधीत वेळोवेळी एकूण 20 लाख रुपये खंडणी उकळली. मात्र आज (शनिवार) त्याने तक्रारदार यांना एकदाच विषय संपवून टाकू असे म्हणत 50 लाख रुपये खंडणी मागत धमकी दिली. त्यामधील 2 लाख रुपयांची खंडणी घेताना खंडणी विरोधी पथकाने आरोपीला सिंहगड रोडवरील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अटक केली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक महाडिक, कर्मचारी वांजळे, अहिवळे, जगदाळे, शिंनगारे यांनी केली.