बहुजननामा ऑनलाइन टीम – रोटरी डिस्ट्रिक 3131 यांच्या तर्फे आयोजित रोटरी मिक्स विंटर कप क्रिकेट 2021 स्पर्धेत अंतिम फेरीत सुपरओव्हरमध्ये कु-बिल्ट मास्टर्स संघाने लवास रॉयल्स संघाचा 10 गडी राखून पराभव ( Rotary Mix Winter Cup Cricket )करत विजेतेपद संपादन केले.
आरएस खांदवे येथील क्रिकेट मैदान व लिजेंड्स क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अतितटीच्या झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत कु-बिल्ट मास्टर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कु-बिल्ट मास्टर्स संघाने 20षटकात 4बाद 173धावाचे आव्हान उभे केले. यात राहुल कामठे 36 मंगेश हांडे 35, आतिश थोरात 22, सुनिल रोहिला 20 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. लवास रॉयल्सकडून दर्शन वणगे(1-43), योगेश वाघ(1-26), रतन खरोल(1-18), प्रीतम खैया(1-38)यांनी प्रत्येकी गडी बाद केला.
या आव्हानाचा पाठलाग करताना लवास रॉयल्स संघ 20 षटकात 173 धावावर संपुष्टात आला. यात योगेश वाघ 33, सौरभ रावेलीया 39, समाधान दांडेकर 35, जयंत येवले 15 यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत संघाला 173 धावा उभारून दिल्या व त्यामुळे सामना बरोबरीत राहिला. सामना बरोबरीत सुटल्यामुळे सुपरओव्हर घेण्यात आली. सुपरओव्हर मध्ये लवास रॉयल्स संघाने 1 षटकात 1 बाद 10 धावा केल्या. विजयासाठी असलेले 10धावांचे आव्हान कु-बिल्ट मास्टर्स संघाने 4चेंडूत एकही गडी न गमावता पूर्ण केले.यामध्ये राहुल कामठेने नाबाद 13, पंकज पाटीलने नाबाद 1धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी मंगेश हांडे ठरला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण जयमल्हार मराठी मालिकेतील सुपरस्टार अभिनेते देवदत्त नागे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.रश्मी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी प्रांतपाल सुबोध जोशी आणि रोटरी डिस्ट्रिक 3131चे क्रीडा विभागाचे संचालक रो. प्रमोद पालीवाल आणि स्पर्धेचे कार्यवाहक रो. महेश घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.