बहुजननामा ऑनलाइन टीम – टॅंकरमधून 23 हजार 300 लिटर मद्यार्काची (दारूतील घटक) अवैधरीत्या वाहतूक केल्याप्रकरणात एकास (Illegal transport of liquor)राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या पोलिसांनी अटक केली. प्रमोदकुमार शामसुंदर कुशवाह (वय 38, रा. महोलीया, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 8 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. तर, त्याच्या अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई बंगळूर हायवेलगत काळेवाडी गावच्या हद्दीत बुधवारी (ता. 6) जानेवारी हा टॅंकर जप्त केला. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी 36 लाख 30 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी अवैध दारूचा साठा केल्याचा संशय असून तो जप्त करायचा आहे. अवैध मद्यार्काच्या वापरामुळे बनावट मद्य निर्मिती केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपींच्या अन्य साथीदारांचा शोध घ्यायचा आहे. त्यांनी आरोपींनी अवैध मद्यार्क विक्री व वापरामुळे महाराष्ट्र शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून सदर गुन्ह्याचा सखोल तपास करणे गरजेचे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.