पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शुक्रवारी सकाळी चालण्यासाठी आलेल्या नागरिकांना चार-पाच कुत्री मुलीच्या सडलेल्या मृतदेहाचे लचके तोडताना दिसले. नागरिकांनी याची माहिती कालव्यात पोहण्यासाठी आलेल्या तरुणांना दिली. खडकवासला येथील सामाजिक कार्यकर्ते कुणाल सरवदे यांना तरुणांकडून याबाबत माहिती मिळताच त्यांनी तत्काळ हवेली पोलीस ठाण्याला कळवला. पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, पोलिस उपाधीक्षक अमृत देशमुख, उपाधीक्षक राहुल आवारे, पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला.
दरम्यान, खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला कालव्याच्या भरावावरील झुडपामध्ये सडलेल्या अवस्थेत चिमुकल्या मुलीचा मृतदेह आढळला होता. सुमारे एक वर्ष वयाच्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात हवेली पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना यश आले आहे. यामध्ये सुदिप पोळ या पोलिस मित्राची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. आरोही संजय तायडे असे त्या मृत मुलीचे नाव आहे.
मृतदेह ज्या ठिकाणी आढळला तिथं नवीन कापडामध्ये मृतदेह गुंडाळून खड्डा खोदून पुरण्यात आल्याचं निदर्शनास आलं होतं. तसंच बोरीच्या काटेरी फांद्या तोडून टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे खुनाची शक्यता नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिस अधीक्षक देशमुख यांनी पाहणी केल्यानंतर काढला होता. दरम्यान, पोलिस मित्राने असं सांगितलं की, साहेब माझ्याकडे माहिती आहे पण खात्री करावी लागेल. घटनास्थळाची पाहणी करून पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी हवेली पोलिस ठाण्यात तपासाच्या अनुषंगाने चर्चा करत होते. त्यावेळी नांदेड (ता. हवेली) येथील सर्व्हे नं.२५ मध्ये राहणारा पोलिस मित्र सुदिप पोळ पोलिस ठाण्यात आला.
दहा-बारा दिवसांपूर्वी आमच्या परिसरात राहणारे भाडेकरी आमच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. मृतदेह पुरण्यासाठी येथे कोठे जागा आहे का? असे विचारत होते. कदाचित हा मृतदेह त्याच मुलीचा असावा, परंतु खात्री करावी लागेल, असे त्याने पोलीस अधीक्षक देशमुख यांना सांगितले. पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार हवालदार रामदास बाबर व पोलिस मित्र सुदिप पोळ यांनी नांदेड फाटा परिसरातील सर्व्हे नंबर २५ मध्ये जाऊन चौकशी केली. तेव्हा संजय तायडे यांनी कपड्यांवरून मृतदेह ओळखला.
काय आहे प्रकरण
आरोही आजारी असल्याने उपचार सुरू होते; परंतु फरक पडत नसल्याने काहींनी संजय तायडे यांना ‘बाहेरचे’ पाहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार संजय तायडे मुलगी आरोहीला घेऊन कराडला गेले. तेथे आरोहीची तब्येत आणखीनच खालावली. शेवटी ते तिथल्याच एका दवाखान्यात घेऊन गेले; परंतु डॉक्टरांनी आरोहीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. कराडमधून आरोहीचा मृतदेह घेऊन संजय तायडे मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पुण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता तायडे यांचे नातेवाईक व मित्रांनी खडकवासला कालव्याच्या भरावावरील झुडपामध्ये खड्डा खोदून मृतदेह पुरला होता. आजारपणामुळे मृत्यू झाल्यानंतर ११ मार्च रोजी तिचा मृतदेह कालव्याच्या भरावावरील झुडपामध्ये खड्डा खोदून पुरण्यात आला होता.