बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आल्यानंतर जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असलेल्या(water bill in lockdown) शहरातील हॉटेल्सना महापालिकेने पाणी पुरवठ्याचे ऍव्हरेज बील पाठविले आहे. हॉटेल बंद असतानाही हजारो रुपयांचे बिल आल्याने हॉटेल व्यावसायीक हवालदील झाले आहेत.
पुणे शहरात १० हजारांंहून अधिक हॉटेल व्यावसायीक आहेत. राज्यात कोरोनामुळे २५ मार्चला लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सर्व व्यवसायांसोबत हॉटेल व्यवसायही बंद ठेवण्यात आला होता. कालांतराने हॉटेलमधून केवळ पार्सल सेवा देण्याची परवानगी देण्यात आली. तर अगदी दीड दोन महिन्यांपुर्वी हॉटेलमध्ये कोरोनाच्या दृष्टीने सुरक्षित अंतर राखून सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.
दरम्यान, लॉकडाउनमध्ये हॉटेलमध्ये काम करणारे परप्रांतीय कर्मचारी त्यांच्या गावी परतले. त्यामुळे अनलॉकनंतर हॉटेल व्यवसाय सुरू करण्यातही चालकांना अडथळे आले. अनेकांनी अपुरे मनुष्यबळ आणि कोरोनामुळे आलेल्या बंधनांच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय बंदच ठेवणे पसंद केेले. या काळात व्यवसाय बंद असतानाही वीज मंडळाने हॉटेल व्यावसायीकांना ऍव्हरेज बिले पाठविली. प्रत्यक्षात वापर कमी अथवा नगण्य असतानाही कुठल्याही रिडींगशिवाय आलेल्या बिलांमुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. तीच बाब महापालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या बिलांबाबत सुरू झाली आहे. महापालिकेने कमर्शियल वापराच्याा सर्वच मीटर धारकांना ऍव्हरेज बिले पाठविली आहेत. छोट्या व्यावसायीकांसाठी ही रक्कम हजारो रुपयांच्या पटीत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बिल कमी केले जाईल – पाणी पुरवठा विभाग
कोरोना काळामध्ये व्यावसायीक वापरासाठीच्या पाण्याची बिले मिटर रिडींग न घेता ऍव्हरेज दराने पाठविली आहेत. महापालिकेकडे अद्याप कोणाची तक्रार आलेली नाही. सध्या पाठविलेल्या बिलांप्रमाणे कोणी रक्कम भरली असेल तर पुढील बिलांमधून ती वजा करण्यात येईल. तसेच कोणी बिल भरण्यापुर्वी महापालिकेशी संपर्क साधल्यास मिटर रिडींग घेउन प्रत्यक्ष बिल देण्यात येईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.