बहुजननामा ऑनलाइन टीम – नगर जिल्ह्यातील बेकायदा चौकी प्रकरणात तत्कालीन तसेच सध्या पुण्यात कार्यरत असणारे व वरिष्ठांच्या मर्जीतील पोलीस निरीक्षकावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. कारवाई केल्याबाबतचा अहवाल न्यायालयात ( illegal police outpost case)सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यासह नगर पोलीस दलात खळबळ माजली आहे.
नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव फाटा येथे बेकायदा पोलीस चौकी उभा केली होती. याप्रकरणी पारनेर येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे व श्रीरामपूर येथील संदीप कुलकर्णी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी 14 जानेवारी रोजी खडपीठात सुनावणी झाली होती. यानंतर 16 जानेवारी रोजी जिल्हा पोलिस प्रमुखांनी खंडपीठात अहवाल सादर केला. मात्र त्यावर खंडपीठाचे समाधान झाले नाही. तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले निरीक्षक मसूद खान व सध्या संगमनेर येथे कार्यरत असलेले पोलीस उपअधीक्षक राहुल मदने या अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.