पुणे : बहुजननामा ऑनलाइन – भरधाव कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर पती-पत्नी जखमी झाले आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कँटाेन्मेंट नाक्यासमोर ही घटना घडली. कार चालवणाऱ्या त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडुरंग जयराम कुलकर्णी (वय ७२) असे मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई दीपक भोईर यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री दहाच्या सुमारास कुलकर्णी कुटुंबीय कँटाेन्मेंट परिसरातून जात होते. त्यावेळी पांडुरंग यांचा मुलगा मोटार चालवित होता. त्याचे नियंत्रण सुटल्यामुळे मोटार दुभाजकाला जाऊन धडकली. त्यामुळे पांडुरंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक अहिवळे तपास करीत आहेत.