बहुजननामा ऑनलाइन टीम – अनधिकृतपणे बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेने बजावलेल्या नोटीसीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी बांधकाम विभागाने चार जागा मालकांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. कोंढवा परिसरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असून महापालिकेने दिलेल्या नोटीसींकडे दुर्लक्ष करणारे जागा मालक आणि विकसकांविरोधात बांधकाम विभागाने विशेष मोहीम सुरु केली असून या मोहिमेअंतर्गत आज चार गुन्हे दाखल करून अनधिकृत बांधकामे करणार्यांना दणका दिला आहे.
विशेषत: कोंढवा खुर्द परिसरात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असल्याबाबत मोठ्याप्रमाणावर तक्रारी आल्या आहेत. यानंतर बांधकाम विभागाने याठिकाणी पाहाणी करून नोटीसेस बजावल्या होत्या. परंतू यानंतरही नोटीसांकडे दुर्लक्ष करून बांधकामांचा सपाटा सुरू होता. याविरोधात बांधकाम विभागाने संबधित जागा मालक आणि विकसकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी ११ जानेवारीपासून विशेष मोहीम राबविली आहे. ३१ मार्चपर्यंत सुरू राहाणार्या या मोहीमेसाठी २५ कनिष्ठ अभियंत्यांची टीम नेमण्यात आली आहे. त्यानुसार अनधिकृत बांधकामांना यापुर्वी दिलेल्या नोटीस, संबधितांनी या नोटीसांना दिलेली उत्तरे आणि सादर केलेली कागदपत्र याचा आढावा घेउन सद्यस्थितीची पाहाणी केल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कार्यकारी अभियंता ना.दे. गंभिरे यांच्या नेतृत्वाखालील उप अभियंत्यांच्या पथकाने आज स.नं. ४६ कोंढवा खु. येथील उजेर सय्यद, सरफराज खान, दादा गायकवाड, एफ.एफ. पठाण यांच्याविरूद्ध महारष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ व ४३ अन्वये कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. उजेर सय्यद यांच्या ५० बाय ३० फूट जागेवर सात मजल्यांचे काम सुरू होते. विशेष असे की मागील वर्षी १४ जानेवारीला तळमजल्याचे अनधिकृतपणे केलेले बांधकाम पाडून टाकण्यात आले होते. याबाबत संबधितांना नोटीसही बजावली होती. परंतू नुकतेच पाहाणी दरम्यान याठिकाणी ७ मजली इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने सय्यद यांच्याविरूद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दादा गायकवाड यांनी त्यांच्या ४० बाय ३० फूट जागेमध्ये दोन वर्षांपुर्वी बांधकाम सुरू केले होते. त्यावेळी बांधकाम विभागाने नोटीस देउन मे २०१९ मध्ये प्लिथंबिमपर्यंत झालेले बांधकाम पाडले होते. परंतू विशेष मोहीमेदरम्यान १५ जानेवारीला पाहाणी केल्यानंतर या जागेवर सात मजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. विशेष असे की चार मजल्यांचा वापरही सुरु झाला होता. त्यामुळे पालिकेने गायकवाड यांच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोंढवा खुर्द येथीलच सरफराज खान व अन्य लोकांना जुलै २०१९ रोजी बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. त्यावेळी ३५ बाय ७० फुट जागेवर फुटींगचे काम सुरू होते. नोटीसीला विहीत मुदतीत उत्तर न आल्याने पालिकेने जोत्यापर्यंत आलेले बांधकाम पाडून टाकले होते. दरम्यान नुकतेच १५ जानेवारीला पाहाणी दरम्यान याठिकाणी पार्किंगसह सात मजली इमारत उभी राहीली असून तिचा वापरही सुरु करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सरफराज खान यांच्यासह त्या इमारतीत राहाणार्यांविरोधात बांधकाम विभागाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा खुर्द येथील एफ.एफ. पठाण आणि अशरफ अत्तार यांनी देखिल महापालिकेने नोटीस बजावून त्यांचे बांधकामावर कारवाई केल्यानंतर बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्याने या दोघांविरोधातही कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.