पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहे. घरातील एका सदस्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबच बाधित होते. त्यातच कुटुंबाचा कर्त्या पुरुषाचा जर मृत्यू झाला तर संपूर्ण कुटुंबच उध्वस्त होतं.
कोरोनामुळे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या दोन सख्ख्या मेहुण्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सतीश कुंडलिक गवारे (वय-52) आणि दत्तात्रय कुंडलिक गवारे (वय-47) अशी मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हे दोघे बंधू दिवंगत रमेश वांजळे यांचे मेहुणे व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हर्षदा वांजळे यांचे सख्खे बंधू आणि माजी उपसरपंच सोपानराव गवारे यांचे ते पुतणे होत.
काही दिवसांपूर्वी दोन्ही भावांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर दोन्ही भावांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मोठा भाऊ सतीश गवारे यांच्यावर पुण्याजवळील उरुळी कांचन या ठिकाणी उपचार सुरु होते. तर लहान भाऊ दत्तात्रय यांच्यावर शिक्रापूर येथे एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, दोघांची प्रकृती अचानक बिघडल्याने दोघांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांवर उपचार सुरु असताना 17 मे रोजी रात्री सतीश यांचे निधन झाले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 18 मे रोजी लहान भाऊ दत्तात्रय गवारे यांचे निधन झाले.
अवघ्या 12 तासांच्या अंतराने या दोन्ही सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. घरातील दोन कर्ते पुरुष एकाकी गेल्यानं कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या घराची सर्व जबाबदारी हे दोघे भावंडचं सांभाळत होते. सतीश गवारे यांच्या मागे बहीण, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. तर दत्तात्रय गवारे यांच्या मागे बहीण, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.