बहुजननामा ऑनलाइन – शहरात सोन साखळी (goldchain snatching) चोरट्यांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले असून बाणेर व धनकवडी भागात महिलांच्या
गळ्यातील सोन साखळ्या(goldchain snatching) हिसकावल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी २९ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी या सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास पायी चालत जात असताना बाणेर रस्त्यावर पाठीमागून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 36 हजार रुपयांचे सोन साखळी हिसकावून नेली. पोलीस निरीक्षक लामतुरे अधिक तपास करीत आहेत. तर दुसऱ्या घटनेत धनकवडी येथे घरातील कचरा टाकून माघारी परतत असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १७ हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली होती. याप्रकरणी मनोज उर्फ आशिष धोडिंबा भोंडवे (वय २६,रा. धनकवडी) याला अटक केली आहे. अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.
शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. मॉर्निंग वॉक तसेच कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. तर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत. आता या टोळ्यांना पकडणे गरजेचे आहे. अन्यथा या टोळ्याचा हैदोस सुरूच राहणार आहे.