बहुजननामा ऑनलाइन टीम – महापालिकेच्या परवनगीशिवाय( Municipal Corporation )पाषाण येथील चार विविध ठिकाणच्या रस्त्यांची खोदाई केल्याप्रकरणी महापालिकेने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला ६ लाख ७८ हजार ८६५ रुपये दंड ठोकला आहे. यासंदर्भातील नोटीस आज विज मंडळाला पाठविण्यात आली आहे.
वीज मंडळाने प्र.क्र.९ पाषाण मधील लक्ष्मण तांडा, रानमळा हॉटेल शेजारी, सोमेश्वर मंदिरालगत तसेच सुतारवाडी लिंक रस्त्यावर मोर चौकामध्ये केबल दुरूस्तीसाठी जवळपास ३१ मीटर रस्त्याची खोदाई केली आहे. ही खोदाई करताना महापालिकेची कुठलिही परवानगी घेतली नाही. विशेष असे की केबल दुरूस्तीनंतरही महापालिकेला कळविले नाही. या खोदलेल्या ठिकाणी पादचारी तसेच वाहन चालकांकडून तक्रारी आल्यानंतर महापालिकेच्या पथविभागाने या परिसरात पाहाणी केली. कुठल्याही परवानगीशिवाय वीज मंडळाने खोदाई केल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेने खोदाई दराच्या तीनपट दंड आकारणीची नोटीस वीज मंडळाच्या सूस रस्ता कार्यालयाला पाठविली आहे.