बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (Pune Graduate Constituency Election) यावेळी तिरंगी लढत होणार आहे. पण निवडणुकीत उमेदवारापेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष बंडखोरी टाळण्यात यशस्वी झाले असले तरी मनसेच्या रूपाली पाटील ठोंबरेंमुळे ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. तसेच मनसेमुळे (Pune Graduate Election)मतविभाजनाचा फटका टाळणे दोन्ही उमेदवारांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण लाड (Arun Lad), भाजपचे संग्रामसिंह देशमुख (Sangram singh Deshmukh) आणि मनसेच्या रूपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांच्यात तिरंगी लढत होत आहे. मतदारसंघात एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत.
मतदारसंघात सुमारे साडेपाच लाख मतदार असून, त्यात सर्वाधिक मतदारांची संख्या पुण्यात आहे. त्या खालोखाल सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये मतदार आहेत. मागच्या पदवीधर निवडणुकीत पंधरा टक्के मतदान झाले. यावेळी मतदारांची संख्या वाढल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. भाजपने अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावीपणे मतदार नोंदणी केल्याने याचा फायदा पक्षाला होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे मतदार नोंदणी केलेले हजारो अर्ज बाद झाल्याचा फटकाही भाजपला बसू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
आजोबा आमदार : रूपाली पाटील-ठोंबरे
पदवीधर हा आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलेला मतदारसंघ आहे. राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन पदवीधरमध्ये करत आले आहेत. या मतदारसंघात आजोबा आमदार असल्याने पदवीधरांचे प्रश्न सुटू शकले नसल्याचा आरोप मनसेच्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केला. मनसेने सत्ता नसतानाही पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावल्याचा दावाही त्यांनी केला.
माझ्यासमोर कोणाचे आव्हान नाही : लाड
अरुण लाड यांनी मागील निवडणुकीत बंडखोरी करत 37 हजार मते मिळवली होती. बंडखोरीनंतर जयंत पाटील यांच्यासोबत असलेल्या जवळीकीमुळे त्यांना उमेदवारी मिळाल्याचे बोलले जात आहे. आम्ही खेडोपाडी फिरलोय, फक्त शहरापुरता हा मतदारसंघ मर्यादित नाही. त्यामुळे माझ्यासमोर कोणाचे आव्हान नाही, असे लाड म्हणाले.
तर दुसरीकडे संग्रामसिंह देशमुख यांचे घराणे नेहमीच काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्याविरोधात उभे ठाकल होते. मात्र, आघाडीमुळे त्यांना पलूस-कडेगाव मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने 2014 ला त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये चंद्रकांत पाटील यांचे पाठबळ देशमुखांना महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या वेळी पुणे पदवीधर निवडणूक निकाल खालीलप्रमाणे :
चंद्रकांत पाटील (भाजप) (विजयी) – 61,453
सारंग पाटील (राष्ट्रवादी)- 59,072
अरुण लाड (बंडखोर)- 37,189
शैला गोडसे – 10,594
शरद पाटील – 8,519