बहुजननामा ऑनलाईन
प्रेम प्रकरणातून तरुणीने प्रियकराला दिवेघातात बोलावून त्याच्यासोबत धूम ठोकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मात्र तरुणी भावाला घेऊन घरी निघाली असताना प्रियकर घाटात कार घेऊन मित्रासोबत आला आणि त्याने शस्त्र दाखवून तिला नेल्याने तरुणीचे अपहरण झाल्याचे समजते. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे एका मुलासोबत प्रेम संबंध आहेत. दरम्यान तिचा काल पुण्यात सीईटीचा पेपर होता. त्यामुळे ती भावासोबत आली होती. पेपर देऊन ते आज सकाळी सासवडला जात होते. यादरम्यान दिवेघाटात आले असता स्विफ्ट कारमधून तिघेजण आले. त्यांनी शस्त्र दाखवत तरुणीला दुचाकीवरुन कारमध्ये बसवून नेले. यानंतर नियंत्रण कक्षाला तरुणीचे अपहरण करण्यात आल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणीकाळभोर पोलिसांनी लागलीच तपासाला सुरुवात केली.
दरम्यान तरुणीचे प्रेम प्रकरण असल्याचे समजले. यानंतर त्यादिशेने तपास सुरू केला. यावेळी तरुणाची माहिती काढण्यात आली.
दरम्यान तरुणीनेच तिच्या पालकांना मी प्रियकरासोबत आले असून, आम्ही लग्न करत असल्याची माहिती दिली. यावेळी सर्व प्रकार समोर आला. तरुणीचे प्रेम प्रकरण असून, ती अल्पवयीन असताना तिला एक मुलगा झाला आहे. यानंतर आता तीला 18 वर्ष पूर्ण झाले असल्याने ते दोघे लग्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे. लग्नानंतर घरी येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले असून, लग्न करत असल्याचे फोटो देखील तिने कुटुंबाला पाठविले आहेत. अधिक तपास सुरू आहे.