पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पिता-पुत्राची लागलेली भांडणे मिटविण्यास गेलेल्या बीट मार्शलला धक्काबुक्की झाल्याची घटना ताडीवाला रस्ता परिसरात घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिस शिपाई सागर जगताप यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत नामदेव भालेराव (वय ३२), सचिन पाडुरंग गायकवाड (वय ३४, रा. चमन बेकरीजवळ, ताडीवाला रोड) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बंडगार्डन पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. ते बीटमार्शल ड्युटीवर आहेत. शनिवारी दिवसपाळीवर कर्तव्याला होते. रात्री दहाच्या सुमारास ताडीवाला रोड परिसरात एका ठिकाणी भांडणे सुरू आहेत, असा फोन नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानंतर पोलिस शिपाई जगताप हे घटनास्थळी गेले. त्यावेळी आरोपी प्रशांत व त्याचे वडील नामदेव यांच्यात वादावादी सुरू होती. त्यावेळी तक्रारदार यांनी दोघांनाही समजावून सांगितले. तसेच, पोलिस चौकीत येऊन तक्रार देण्यास सांगितले. जगताप हे प्रशांत याला सोबत पोलिस चौकीजवळ घेऊन आले. त्यावेळी आरोपीने मला पोलिस चौकीजवळ कशाला आणले, असे म्हणून त्यांना शिवीगाळ सुरू केली. तसेच, त्यांना धक्काबुक्की केली. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.