पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime Branch | पुण्यात ड्रग्स तस्करी सुरुच आहे. त्यातच आता पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 3 कोटी 58 लाख रुपये किंमतीचं मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त केलं आहे. ही कारवाई शहरातील मध्यभागी असणाऱ्या सोमवार पेठ परिसरात रविवारी (दि.19) रात्री करण्यात आलेली आहे. यामुळे ड्रग्ज तस्करांचे पुण्यातील रॅकेट उघडकीस आले आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. (Pune Police Seize MD Drugs)
पोलीस रेकॉर्डवरील आरोपी वैभव उर्फ पिंट्या भारत माने, त्याचा ड्रायव्हर अजय आमरनाथ करोसिया (य-35 रा. पुणे), हैदर नुर शेख (रा. विश्रांतवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई आहे. मागिल काही महिन्यापासून पुणे शहरात ड्रग्ज तस्करांकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होत आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.(Pune Crime Branch)
गुन्हे शाखा युनिट एकचे पथक रविवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे यांना माहिती मिळाली की, सोमवार पेठेत एक पांढऱ्या रंगाची इर्टिगा (एमएच 12 युजे 4081) कार मध्ये दोन जण बसले असून त्यापैकी पोलीस रेकॉर्डवरील आरोपी वैभव उर्फ पिंट्या माने हा असून त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने वैभव माने याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक कोटी रुपये किंमतीचे 500 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता विश्रांतवाडी येथे राहणारा हैदर शेख याने माने याला एमडी ड्रग्ज दिल्याचे समजले.
यापूर्वी पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २ कोटीचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅम चे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले होते. जप्त केलेल्या MD म्हणजेच मेफिड्रोनची किंमत तब्बल २ कोटी रुपये इतकी होती. या प्रकरणात ललीत पाटीलला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ललीत पाटीलचे पूर्ण राज्यातील कनेक्शन उघड झाले होते.
आरोपी हैदर शेख याचा शोध घेण्यासाठी पाच पथके विश्रांतवाडी येथे रवाना करण्यात आली. पोलिसांनी शेख याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे एक कोटी किंमतीचे क्रिस्टल पावडर स्वरुपातील 500 ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ आढळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता विश्रांतवाडी परिसरातील एका पत्र्याच्या गोडाऊन असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गोडाऊनची तपासणी केली असता त्याठिकाणी 200 ते 300 पोती मिळून आली. त्यामध्ये मीठ असल्याचे आढळून आले असून पोत्यामध्ये एमडी ड्रग्ज आहे का याची तपासणी पोलीस करीत आहेत. हैदर शेख याच्याकडे चौकशी केली असता एमडी ड्रग्ज एका परदेशी व्यक्तीने विक्री करण्यासाठी दिल्याचे सांगितले.
आरोपी हैदर शेख याच्या ताब्यातून एक कोटी रुपयांचे 500 एमडी ड्रग्ज, मोबाईल, सॅक, गोडावुनमधून दीड कोटी रुपयांचे
750 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, इलेट्रॉनिक वजन काटा, तसेच वैभव उर्फ पिंट्या माने याच्याकडून एक कोटी रुपयांचे 500 ग्रॅम एमडी ड्रग्ज, सॅक, दोन मोबाईल, 8 लाख रुपये किंमतीची इर्टिगा कार जप्त केली आहे. दोघांकडून 3 कोटी 58 लाख 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे,
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल तांबे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2
सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, अजय वाघमारे, राजेंद्र लांडगे,
अनितस हिवरकर, विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक बाबर, गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रमेश तापकीर,
शेळके, गोरे, कोळेकर, मगदुम, देव, नाईक, जाधव, शिंदे, मोकाशी, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, अभिनव लडकत,
दत्ता सोनवणे, निलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशीकांत दरेकर, शुभम देसाई, शंकर कुंभार, आय्याज दड्डीकर,
सुजित वाडेकर, संतोष देशपांडे, निखिल जाधव यांच्या पथकाने केली.