नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबरच कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना पहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर दशभरातील अनेक उच्च न्यायालयांमध्ये, तर सर्वोच्च न्यायालयानेही कोरोनाशी निगडीत याचिकांवर सुनावणी सुरु केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी भाजप खासदार गौतम गंभीर यांचा उल्लेख करत न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी कोरोनावरील फॅबीफ्ल्यू औषधांचे वाटप केले आहे. त्याची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. कोरोनाचं औषध वाटप करायला गौतम गंभीर यांच्याकडे लायसन्स आहे का ? औषधांचे वाटप करण्यापूर्वी गंभीर यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता का ? असा सवाल कोर्टाने केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विपीन सांधी आणि रेखा पल्ली यांच्या खंडपीठासमोर एक याचिकेवर सुनावणी सुरु होती. त्यावेळी कोर्टाने हा सवाल केला.
न्यायालयाकडून प्रश्नांची सरबत्ती
औषधे विकण्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. लायसन्स नसताना कोणत्याही व्यक्तिला औषधांचं वाटप करण्याची परवानगी कशी मिळू शकते ? औषधे वाटण्यासाठी खासदार गौतम गंभीर यांनी लायसन्स घेतले होते का ? कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचे वाटप करत होते ? असे थेट प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयाने उपस्थित केले आहेत.
काम चांगलं आहे पण पद्धत चुकीची
गौतम गंभीर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा असल्याने त्यावरही कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले आहे. यापूर्वी दिल्ली सरकारच्या वकिलाने कोर्टात याबाबतची माहिती दिली होती. लोकांना फॅबीफ्ल्यू औषध मिळत नसताना एक नेता सर्रासपणे फॅबीफ्ल्यू औषधाचे मोफत वाटप करत आहे, असे वकिलाने म्हटले होते. त्यावर ते काम चांगलं आहे, पण पद्धत चांगली नाही, असं कोर्टाने म्हटले.