पुणे – बहुजननामा ऑनलाईन – एरंडवणा येथील कमिन्स कंपनीमध्ये कोरोनाची लागण झालेले ५० कामगार आढळल्याने खळबळ उडाली आहे. शासन आणि महापालिकेने कोरोना संदर्भात घालून दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यानेच कामगारांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरल्याचा ठपका ठेवत पुणे महापालिकेने तीन दिवस कंपनी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्वच कर्मचार्यांची कोरोना टेस्ट करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये काही अटीशर्तींवर कंपन्या व सार्वजनिक व्यवहारांना परवानगी दिली आहे. शासनाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनीही तसे वेळोवेळी आदेश काढले असून महापालिका हद्दीमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू आहे. महापालिकेने शहरातील आस्थापनांचा दोन महिन्यांचा अहवाल मागविला आहे. त्यामध्ये कमिन्स कंपनीमध्ये मागील दोन महिन्यांत ३ कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण कामगार संख्येच्या २० टक्के अर्थात २४० कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या २४० पैकी ५० कामगार कोरोनाबाधित आहेत.
कंपनीमध्ये कामगारांसाठी जेवण्यासाठी एकच मेस आहे. याच ठिकाणी कामगार जेवणासाठी एकत्र येतात. याचठिकाणी सर्वाधीक पसरल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य शासन आणि महापालिकेच्या कोरोना संदर्भातील निर्देशांचे पालन न केल्याने पुढील तीन दिवस (२३ मे) कंपनी बंद ठेवण्यात यावी. सर्व कामागारांची क्षेत्रिय वैद्यकिय अधिकार्यांकडून रॅपीड ऍन्टीजेन अथवा आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. ही चाचणी झाल्यानंतर पुन्हा दहा दिवसांत फेरचाचणी घ्यावी. सर्व कामगारांना फेसशिल्ड मास्क उपलब्ध करून द्यावेत. कंपनीच्या कॅन्टीमध्ये जेवणास प्रतिबंध करण्यात यावा. कंपनीतील कामगारांचे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, तसेच वेळोवळी सर्व यंत्रसामुग्री निर्जंतुकीकरण करून घ्यावी, असे आदेश कंपनीला देण्यात आल्याचे रुबल अग्रवाल यांनी नमूद केले.
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासकिय यंत्रणा काम करत आहे. शासन आणि महापालिकेच्या आदेशानुसार सुरू असलेल्या व्यावसायीक आस्थापनांनी कोव्हिड १९ नियमावलीचे पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल.
– रुबल अग्रवाल (अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका)
होम क्वारंटाईन रुग्णांसाठी ओपीडी
होम क्वारंटाईन असलेल्या कोरोना बाधितांसाठी महापालिका आणि संचेती हॉस्पीटलच्या संयुक्त विद्यमाने ओपीडी सुरू करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने जागा व काही प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर वैद्यकीय स्टाफ व एक्स रे व अन्य सुविधा संचेती रुग्णालयाच्यावतीने पुरविण्यात येणार आहे. येरवडा व अन्य एक दोन ठिकाणी या ओपीडी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. होम क्वारंटाईन असताना काही त्रास जाणवल्यास रुग्ण याठिकाणी मोफत तपासणी करू शकणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.