पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मित्र आणि कुटुंबाच्या सांगण्यावरून प्रियकराने लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याच्या नैराश्यातून 23 वर्षीय तरुणीने ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीने सुसाईड नोट लिहून ठेवली होती.
पूर्णा बशपंती चौधरी (वय 23) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी प्रियकर कपिल मदन गोरे याच्यासह कुटुंबीय आणि दोन मित्रांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्णा हिच्या वडिलांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी कुटुंब मूळचे मध्यप्रदेश येथील आहे. पूर्णा ही एका ठिकाणी जॉब करत होती. ती उच्च शिक्षित होती. दरम्यान कपिल व ते एकाच परिसरात राहत असल्याने त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या 5 वर्षांपासून त्यांचे प्रेम प्रकरण सुरू होते. यानंतर त्यांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा साखरपुडा देखील झाला. मात्र यानंतर कपिल हा मित्र व कुटुंबीय यांच्या सांगण्यावरून लग्न करण्यास टाळाटाळ करू लागला.
तर तिच्याशी फोनवर बोलण्यास देखील टाळाटाळ करत असे. यामुळे ती नैराश्यात होती. या नैराध्यातूनच पूर्णा हिने राहत्या घरी ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात तिने तो इतरांच्या सागण्यावरून लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याचे म्हंटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक काळे या करत आहेत.