पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना होम क्वारंटाईनची मुभा दिल्यानंतर महापालिकेने उभारलेल्या १७ क्वारंटाईन सेंटर्सपैकी ८ क्वारंटाईन सेंटर्स महापालिकेने बंद केली आहेत. त्यामुळे क्वारंटाईन सेंटर्समध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी काढण्यात आलेल्या दोन निविदा रद्द करण्यात आल्या असून बंद करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमधील सीसीटीव्ही यंत्रणा ज्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आवश्यक असेल तेथेच बसविण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे नगर अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही क्वारंटाईन सेंटरमध्ये सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. परंतू उर्वरीत सेंटर्ससाठी सीसीटीव्ही बसविण्यासाठी दोन निविदा काढण्यात आल्या होत्या.
या निविदा प्रक्रीया एका ठराविक ठेकेदारालाच मिळावी यादृष्टीने निविदेत अटी शर्ती घालण्यात आल्याने अगोदरपासूनच या खरेदीवर काही सदस्यांनी आक्षेप नोंदविले होते, त्यामुळे ही प्रक्रिया वादाच्या भोवर्यात अडकली होती. अशातच सणस स्पोर्टस ग्राउंड येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये खुल्या बाजारात १५ हजार रुपये किंमत असलेला एलईडी टीव्ही २५ हजार रुपयांना खरेदी करण्यात आला. असे ३० टीव्ही संच खरेदीत पालिकेचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिकच दक्ष झाले आहे. महापालिकेच्या कोणत्या क्वारंटाईन सेंटरमध्ये किती सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, याची यादी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही यंत्रणा असलेले परंतू सध्या बंद केलेल्या क्वारंटाईन सेंटरमधील यंत्रणा ज्या सेंटरमध्ये गरज आहे, तेथे शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नवीन खरेदीसाठी काढण्यात आलेल्या दोन्ही निविदा रद्द करण्यात आल्याची माहिती श्रीनिवास कंदुल यांनी दिली.