अंबरनाथ : बहुजननामा ऑनलाईन – भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अंबरनाथ एमआयडीसी जवळ गुरुवारी (दि. 1) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
चंद्रकांत भागवत (रा. मूळ मोरवली) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. भागवत सध्या बदलापुरात कात्रप परिसरात वास्तव्यास होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत भागवत हे बदलापूरहुन अंबरनाथच्या दिशेने येत असताना अंबरनाथ एमआयडीसी रोडवरील वैभव हॉटेल चौकात एका भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट रस्त्यावरील दुभाजकाला धडकून भागवत यांच्या दुचाकीवर आला. यात भागवत यांचा जागीच मृत्यू झाला. भागवत यांच्या दुचाकीबरोबरच ट्रकने आणखी एका चारचाकी वाहनालाही धडक दिल्याने त्या वाहनाचा चालक किरकोळ जखमी झाला आहे.