बहुजननामा ऑनलाइन टीम – लष्करी अधिकारी (military-officers) असल्याचे भासवून एक दोन नव्हे तब्बल 5 जणींशी लग्न करून महिलांची फसवणूक करणा-या एका भामट्याला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या तोतया अधिका-याने शहीद जवानांच्या पत्नींना वन रॅंक पेन्शन(army officer) मिळवून देतो, असे सांगून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. लष्करी गणवेश परिधान करून कॅम्प परिसरात संशयास्पदरित्या फिरताना पकडून लष्कराने त्याला कॅम्प पोलिसाच्या ताब्यात दिले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर बिंग बाहेर पडले.
मंजुनाथ बिरादार असे या तोतया लष्करी अधिका-याचे नाव असून, तो विजापूर जिल्ह्यातील नालवतवाड गावचा राहणारा आहे. लष्करात सुभेदार मेजरपदी असल्याची बतावणी करून त्याने तब्ब्ल पाच जणींशी लग्न केले आहे. तसेच दहापेक्षा अधिक शहीद जवानांच्या पत्नींना वन रँक पेन्शन देण्याचे सांगून पैसे उकळले आहेत. अनेक तरुणांना लष्करात नोकरी लावतो म्हणून हजारो रुपये आपण घेतल्याचे त्याने पोलीस चौकशीदरम्यान कबूल केले आहे.
या भामट्याने अनेक ठिकाणी असे उपद्व्याप केले असून, एखाद्या गावात जाऊन लष्करी गणवेशात रुबाब मारून अनेक गावातील मान्यवर मंडळींची भेट घेऊन आपण अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्यावर छाप पाडत असे, तर कधी मी अनाथ आहे असे सांगून मला लग्न करण्याची इच्छा असल्याचे सांगायचे. अशापद्धतीने सहानुभूती मिळवून त्याच गावातील मुलीशी लग्न करून महिनाभर सासुरवाडीत पाहुणचार घ्यायचा आणि अचानक गायब व्हायचा असे त्याचे उपद्व्याप सुरू होते. हे प्रकरण त्याच्या गणवेशावरून बाहेर आले. गणवेश घालून कॅम्प भागात फिरताना ही बाब लक्षात आली आणि त्यानंतर कॅम्प पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले अाणि बेड्या ठाेकल्या.