बहुजननामा ऑनलाइन टीम – पोलीस असल्याची बतावणी करुन एका महिलेला लुटणाऱ्या इराणी टोळीतील (Irani Gang) सराईत आरोपी भावांना पोलिसांना अटक (Arrest) केली. आरोपींना नवघर पोलिसांनी (Navghar Police) भिवंडी येथून अटक केली. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसावर हल्ला करत गाडीची तोडफोड केली, (accused brothers)तरी देखील पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भाईंदर पूर्वमध्ये 5 नोव्हेंबर रोजी एका 56 वर्षीय महिलेला आम्ही पोलीस असल्याची बतावणी आरोपींनी केली. पुढे खून झाला असून गळ्यातील सोन्याची साखळी काढून पुडीत ठेऊन देतो असे सांगून हातचलाखीने महिलेची 12 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी लंपास केली. पोलीस असल्याची बतावणी करुन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे व योगेश काळे यांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला. सुरुवातीला पोलिसांनी परिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये महिलेची सोन्याची साखळी चोरणारे हे इराणी टोळीतील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींची सखोल माहिती गोळा केली असता हे आरोपी भिवंडी, पिराणी पाडा आणि अंबिवली या ठिकाणी असलेल्या इराणी वस्तीत राहणारे असल्याचे समजले.
पोलिसांना इराणी वस्तीतीत असलेल्या वफा कंपाऊंडमध्ये हे दोन्ही आरोपी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिस 12 डिसेंबर रोजी वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांसारखी वेशभूषा करून एका खासगी वाहनातून वस्तीमध्ये दाखल झाले. याठिकाणी पथकाने दोघांचा शोध सुरु केला. पथकाने 26 आणि 23 वर्षाच्या दोन आरोपींना अटक केली. पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतल्याचे समजताच आरोपींनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
आरोपींचा आरडाओरडा ऐकून त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी जमा झाले. त्यांनी पोलिस पथकावर हल्ला केला. तसेच जमावाने पोलिसांच्या वाहनांच्या काचा फोडून आरोपींना सोडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आपल्या जीवावर बेतले असताना देखील आरोपींसह स्वत:ची सुटका करुन घेतली. अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी एकावर दरोडा व चोरीचे 12 गुन्हे दाखल आहेत. काशीमीरा, पडघा, नारपोली पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे व योगेश काळे, बाळू राठोड, रवींद्र भालेराव, नवनाथ माने, युनूस गिरगावकर, निलेश शिंदे, संदीप जाधव व पोलीस मित्राच्या पथकाने संयुक्त रित्या केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.