PMC On Air Pollution In Pune | हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका स्थापन करणार पथके ! विशेषत: बांधकामांच्या ठिकाणी धुळीमुळे होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

PMC On Air Pollution In Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – PMC On Air Pollution In Pune | दिल्ली, मुंबई पाठोपाठ मोठ्या शहरांमध्ये हवेची प्रदूषण पातळी धोकादायक स्तरावर पोहोचल्याने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वच महापालिकांना प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेने हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषणाबाबत नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबधित सर्वच अधिकार्‍यांना यासंदर्भाने केलेल्या कार्यवाहीची माहिती रोजच्या रोज आयुक्त कार्यालयाला कळविण्यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी आदेश दिले आहेत. (PMC On Air Pollution In Pune)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

दिल्लीतील हवेचे प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या तक्रारी उदभवू लागल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली असून अन्य उपाययोजनाही करण्यात येत आहेत. मोठ्या शहरांमधील प्रदूषण पातळी दिवसेंदिवस वाढत असून दिवाळी निमित्त होणार्‍या आतषबाजीने त्यात भर पडणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहीले असून थंडीही कमी आहे. दिवसा रात्री उकाडा आणि पहाटे थंडी आणि त्याला प्रदूषणाची जोड यामुळे श्‍वसनाचे विकास वाढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर केंद्र शासनाकडून मिळालेल्या सूचनांनुसार राज्य प्रदूषण नियामक मंडळाने सर्वच महापालिकांना हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्याचा आधार घेउन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरासाठी नियमावली केली आहे. विशेष असे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) आज सर्वच महापालिकांची ऑनलाईन मिटींग घेउन प्रदूषण कमी करण्यासाठी अत्यावश्यक उपाययोजनांसंदर्भात सर्वच महापालिकांना सूचना केल्या आहेत. (PMC On Air Pollution In Pune)

प्रामुख्याने बांधकाम आणि खोदाईमुळे निर्माण होणार्‍या धुळीमुळे हवा प्रदूषित होत आहे. पुण्यासारख्या प्रमाणावर मोठ्याप्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर बांधकामांच्या ठिकाणी आवश्यक काळजी घेण्याबाबत संबधितांना आदेश देण्यात आले आहेत. परवानगी देतानाच्या नियमांनुसार कामाच्या ठिकाणी नियोजन केले जात नसल्यास कारवाई करावी, असे आदेशात नमूद केले आहे. बांधकाम विभागाकडील अभियंते आणि क्षेत्रीय कार्यालयावरील सहाय्यक आयुक्त कार्यालयांनी त्यांच्या क्षेत्रात हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची व उपक्रमांची माहिती रोजच्या रोज गुगलशीटवर टाकण्याचे बंधनकारक केले आहे. यासाठी प्रत्येक सहाय्यक आयुक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखालील उप अभियंता, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक निरीक्षकांचा समावेश असलेली हवा प्रदूषण नियंत्रण पथके स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

हवा प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी शिक्षण मंडळ, जनसंपर्क विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाने संयुक्तपणे व्यापक उपक्रम हाती घ्यावेत. यासोबतच प्रदूषणाबाबतची माहिती महापालिकेच्या संकेत स्थळावर अपलोड करणे, बंधनकारक राहील, असेही या आदेशात नमुद केले आहे.

हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रमुख सूचना :

* बांधकामाच्या ठिकाणी चोहोबाजूने किमान २५ फूट उंचीचे पत्रे लावले आहेत याची खातरजमा करण्यात यावी.
* बांधकाम सुरू असलेल्या इमारतींच्या भोवती हिरव्या रंगाचे कापड लावले आहे का? याची तपासणी करावी.
* इमारत अथवा बांधकाम पाडताना भोवती हिरव्या ओल्या कापडाचे अच्छादन बंधनकारक आहे.
* बांधकामाच्या ठिकाणचे साहित्य लोडींग अडलोडींग करताना पाण्याची फवारणी करणे.
* राडारोडा, क्रश सँड, सिमेंट वाहतूक करणारी वाहनातून माल रस्त्यावर पडणार नाही, यासाठी अच्छादन टाकावे.
* राडारोडा महापालिकेने नेमून दिलेल्या ठिकाणीच टाकावा.
* रात्रीच्यावेळी उघड्यावर राडारोडा टाकणार्‍यांवर कारवाईसाठी प्रशासनाने पथके नेमावीत.
* बेकरींमध्ये लाकडी भट्टयांचे रुंपातर इलेक्ट्रीक अथवा पीएनजी गॅसवर करण्यासाठी प्राधान्य देणे.
* हवा प्रदूषणाबाबत सातत्याने जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करणे.