बहुजननामा ऑनलाइन टीम – पिंपरी : दारु पिऊन शिवीगाळ करीत असल्याच्या रागातून तरुणाचा खुन करुन त्याचा मृतदेह परतवाडी ते बेबेड ओव्हळ गावाच्या रोडवरील नदीत फेकून देण्यात आला होता. ऑगस्ट २०१८ मध्ये घडलेल्या या खुनाची उकल गुन्हे शाखेच्या युनिट २ने केली असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
शंकर ब्रम्हदेव शिंदे (वय २७, रा. मिलिंदनगर, सेक्टर नं. २२), रवी अशोक मोरे (वय २७, ओटा स्कीम, निगडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार अमोल बसवराज वाले (रा. मिलिंदनगर), राज्या ऊर्फ मेघराज संजय वाले (रा. मिलिंदनगर) आणि आझाद मुल्लाणी (रा. मोरेवस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहदेव मारुती सोळंकी (वय ३५) याचा मृतदेह ऑगस्ट २०१८ मध्ये नदीपात्रात सापडला होता. परंतु, या गुन्ह्याची उकल झाली नव्हती.
सहदेव सोळंकी हा दादागिरी करीत असे. दारु पिऊन तो शिवीगाळ करीत असे. त्या रागातून शिंदे, मोरे व इतरांनी कट रचून सोळंकी याला दारु पिण्यासाठी बोलावले. त्याला दारु पाजली. त्यानंतर आझाद मुल्लाणी यांच्या कारमधून ते सर्व जण नवीन आरटीओ कार्यालयाकडे जाणार्या रोडवरील एमआयडीसीच्या भागातील मोकळ्या जागेत आले. तेथे त्यांनी सहदेव साळंकी याला मारहाण करुन दोरीने त्याचा गळा आवळून खुन करण्यात आला. आझाद मुल्लाणी याला खुनाची माहिती झाल्यानंतरही त्याने त्याच्या गाडीतून परतवाडी ते बेबेड ओव्हळ गावचे रोडवरील नदीत मृतदेहाला दगड बाधून फेकून देण्यात आली. मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केला.