पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. पुणे शहरात आणि जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1837 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 1837 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 37 हजार 850 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1420 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्य़ंत 1 लाख 18 हजार 912 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 3045 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 11 रुग्ण शहरातील आहेत. तर 2 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2822 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 1988 तर हद्दीबाहेरील 834 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण सांगवी, पिंपरी, वल्लभनगर, चिंचवड, चिखली, अकुर्डी, भोसरी, निगडी, जुन्नर, आळंदी येथील रहिवाशी आहेत.