पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – हॉटेल रेस्टॉरंट बार व वाईन शॉपचे लायसन्स काढून देतो, तसेच पेन्शन चालू करुन देऊन मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून भाच्याने मामासह एकाला ९३ लाख ४० हजार ७३८ रुपयांना गंडा घातला आहे.
कृष्णदेव बबन काशीद (रा. लोहगाव, ता. जत, जि. सांगली) याच्याविरुद्ध चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दत्तात्रय नारायण साळुंखे (वय ४६, रा. साईदर्शन पार्क, कृष्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे नात्याने मामा व भाचे आहेत. काशीद याने साळुंखे यांना हॉटेल रेस्टॉरंट बार व वाईन शॉपचे लायसन्स काढून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून नोव्हेंबर २०१८ पासून वेळोवेळी ७० लाख ६ हजार ९८८ रुपये घेतले. परंतु, हॉटेल रेस्टॉरंट बार व वाईन शॉपचे लायसन काढून न देता फसवणूक केली. काशीद याने बनावट चलन व बँक खात्यामध्ये रक्कम जमा केल्याच्या बनावट पावत्या देऊन फिर्यादी यांची फसवणूक केली. तसेच त्यांच्या कारचा अपघात झाला आहे, असे भासवून फिर्यादी यांचेविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी व कार सोडवून आणण्यासाठी ४ लाख ३३ हजार७५० रुपये घेतले आहे.
तसेच मोहन शामराव शिंदे (रा. वाघोल, ता. कवठे महाकाळ, जि. सांगली) यांच्या सर्व्हिसचे पैसे मिळवून देण्यासाठी व पेन्शन चालू करुन देतो. त्यांचा मुलगा मयुर शिंदे याला कॉलेजमध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवून शिंदे यांचा विश्वास संपादन करुन १९ लाख रुपये घेतले. त्यांना सर्व्हिसचे पैसे व पेन्शन चालू करुन दिले नाही तसेच मुलाला नोकरी लावून न देता फसवणूक केली.