नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावतींना दणका देत मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात पुतळ्यांवर खर्च केलेले पैसे परत करण्याचा आदेश दिला होता. त्यावर आज, मंगळवार (दि.२) मायावतींनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात त्यांनी, पुतळे उभारणे ही तर लोकांची इच्छा होती, असे नमूद करण्यात आलेले आहे .
सरकारी पैशाचा दुरुपयोग करून पक्षाचे चिन्ह असलेल्या हत्तीचे आणि आपले स्वतःचे पुतळे उभारले. हा जनेतच्या पैशाचा गैरवापर आहे, असे सांगत पुतळ्यावर खर्च केलेले सरकारी पैसे परत करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यावर मायावतींनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.
मायावतींच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात २००७ आणि २०१२ दरम्यान मायावती तसेच बीएसपीचे संस्थापक कांशीराम आणि बीएसपीचे निवडणूक चिन्ह हत्ती यांचे पुतळे उभारण्यात आले होते. स्मृतिस्थळे आणि पुतळ्यांवरती सुमारे २ हजार ६०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. सरकारी पैशाचा स्वतःचे पुतळे उभारण्यासाठी आणि राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी वापर करू शकत नाही, असा दावा याचिकाकर्त्याने केला होता.
मायावती यांनी स्वतःचे,तसेच पक्षाचे चिन्ह यांचे पुतळे उभा केल्याच्या प्रकरणावरून बऱ्याच दिवस चर्चेत होत्या ,ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत .