अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – बियाणी चौकातील भारतीय स्टेट बँक शाखेने पारधी समाजाला मुद्रा कर्ज नाकारल्याचा प्रकार अमरावतीत घडला. बँकेच्या व्यवस्थापकाविरुद्ध गाडगेनगर पोलिस चौकीत शुक्रवारी दि. २२ रोजी अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला. अनिल अंतुराव चव्हाण (२६) यांच्या तक्रारीवरून पंकज चिखले यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
‘मेक इन इंडिया’ला चालना देण्यासाठी तसेच देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा यासाठी ८ एप्रिल २०१५ रोजी, २०००० करोड रुपये भांडवल असलेली ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी’ अर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. ही बँकनसून अर्थपुरवठा करणारी संस्था आहे. याला कंपनीचे स्वरूप देण्यात आले आहे. भविष्यात हिला बँकेचे स्वरूप येईल म्हणून मुद्रा बँक या नावानेही या संस्थेला ओळखले जाते.
पण भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लोन कर्त्यांना अपमान जनक शिवीगाळ केली. पारधी समाज रस्त्यावर फिरतो. तुम्हाला सगळे फुकट पाहिजे. मी तुम्हाला योजनेचा लाभ देऊ शकत नाही. असे चिखले म्हणाले. त्यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावून पाच सहा जणांना बाहेर काढत जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले. असे तक्रारीत नमूद आहे.
पारधी समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला होता. पण त्यावर काही कार्यवाही झाली नाही. असे शिष्टमंडळाने सांगितले या पुढे काही कारवाही झाली नाहीतर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.