नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सामाजिक राजकिय आंदोलनांच्या लढ्याची दखल पॅलेस्टाईन सरकारने घेतली आहे. नवी दिल्ली येथे पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींच्या वतीने भारतातील पॅलेस्टीनी राजदुत अदनान अबुल हाईजा यांनी नवी दिल्लीत प्रकाश आंबेडकरांचा गौरव केला आहे.
यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडी पॅलेस्टाईनच्या नागरिक आणि सरकारच्या बाजूने आहे. पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्य लढ्याला आमचा पाठींबा आहे. आम्ही पॅलेस्टाईनच्या बाजूने ठामपणे उभे राहू. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव डॉ. अब्दुल अंजारीया, अॅड. एस. के. सागर, डॉ बी. पी निलारत्न (माजी आयएसए अधिकारी) उपस्थित होते.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून वंचितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यात वंचितांची मोठी शक्ती त्यांनी निर्माण केली आहे. वंचित समाजाच्या न्याय हक्कासाठी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या सामाजिक आणि राजकिय कार्याची दखल पॅलेस्टाईनकडून घेण्यात आली आहे. पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती मोहम्मद अब्बास यांच्या वतीने पॅलेस्टीनी राजदुत अदनान अबुल हाईजा यांनी त्यांना सन्मानित केले. सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.