पुणे बहुजननामा ऑनलाईन – केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत तसेच डिक्की (दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स) आणि बँक बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील तसेच महाराष्ट्रातील अनुसुचित जाती व जमातीतील तरुण बेरोजगारांना व्यवसायात उभे करण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेसाठी डिक्कीने पुढाकार घेतला असून डीक्कीचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते मराठवाडा विभागातील तरुणांना आज टँकरचे वितरण करण्यात आले.
यावेळी बँक ऑफ बडोदाचे डेप्युटी झोनल हेड हरिष चांद ,बँक ऑफ बडोदाचे पुणे झोनचे मुख्य व्यवस्थापक नितीन जमाणिक हे उपस्थित होते. या वेळी मिलिंद कांबळे म्हणाले की, केंद्र सरकारची स्टँड अप इंडीया योजना अत्यंत चांगली असून त्याचा लाभ सर्व बेरोजगार तरुणांनी घ्यावा. तसेच बँक ऑफ बडोदाने दलित तरुणांना मदत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सयाजीराव गायकवाड यांचे खरे कार्य केले आहे. कारण बडोदा बँकेची स्थापना सयाजीराव गायकवाड यांनी केली आहे आणि त्यांनी आंबेडकरांना त्याकाळी परदेशी शिक्षणासाठी मदत केली होती. आजच्या तरुणांनी याचा आदर्श समोर ठेवला पाहिजे.
पुढे कांबळे म्हणाले की, आता राज्य सरकारशी चर्चा करून नवीन धोरण करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत राज्य सरकार १५ टक्के सहभाग या योजनेत देणार आहे. तर केंद्राचा २५ टक्के आणि राज्याचा १५ टक्के असा ४० टक्के सहभाग शासन देणार आहे. त्यामुळे यापुढे डिक्की आणि शासनाच्या वतीने येत्या काळात दलित समाजातील तरुणांना व्यवसायात उभे करण्याचे ठरविले आहे.
नितीन जमाणिक म्हणाले की, बँका या सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठीच आहेत. उपेक्षित माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम बँका करू शकतात आणि डिक्कीने आमच्याबरोबर मिळून काम करण्याचे ठरविल्याने आम्हाला आज गरजू लोकांना मदत करता येत आहे . यावेळी डिक्कीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज आदमाने, पुणे प्रेसिडेंड अशोक ओहोळ तसेच मराठवाडा विभागाचे प्रमुख व लाभार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.