बहुजननामा ऑनलाईन – नियुक्तीच्या अवघ्या २ महिन्यानंतर पाकिस्तानातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने (एसएचओ) बलात्काराच्या २०० प्रकरणांचा तपास लावला आहे. कुलसूम फातिमा असे या महिलेचे नाव आहे. पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती झाल्यानंतर या महिला पोलीस अधिकाऱ्याने लगेचच बलात्काराच्या प्रकरणांची चौकशी करण्यास सुरुवात केली आणि या प्रकरणांचा तपासही लावला.
याबाबत माहिती देत असताना फातिमा म्हणाल्या की लहान मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटना ऐकून मला खूप राग येत असे. मात्र मी काहीच करू शकत नाही याची मला खूप मोठी खंत वाटत होती. त्यामुळे मी या मुलींना कसा न्याय देऊ शकते. असा विचार केला आणि ज्या पदावर जाऊन मी या मुलींना न्याय देऊ शकेन असे पद मिळवण्याचे ठरवले. त्यातच मी पंजाब पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण झाले. ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती. त्यामुळे मी मिळालेल्या संधीच सोन केले असं फातिमा यांनी सांगितलं.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की मला पहिल्यापासून पोलीस म्हणून नोकरी करण्याची खूप इच्छा होती. व पुढे जाऊन ती पूर्ण झाली त्याचा मला आता खूप आनंद होत आहे आणि माझ्यावर महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांचा तपास करण्याची जबाबदारी दिली आहे. असे फातिमा यांनी सांगितले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकपट्टणसारख्या भागामध्ये पोलीस अधिकारी म्हणून पहिल्यांदाच महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. फातिमा यांच्या या कामामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढेल. असं मत फातिमा यांना या कामासाठी नियुक्त करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.