नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयएनएक्स मीडिया प्रकरणी चर्चेत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम तब्बल 27 तासांनंतर नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात हजर झाले आहेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी माध्यमांशी सपंर्क साधला आहे. मी कोठेही पळून गेले नव्हतो तर मी माझ्या वकिलांसोबत लढण्याची तयारी करत होतो असे त्यांनी म्हटले आहे. अतिशय नाट्यमयरित्या ते पत्रकार परिषदेत आल्याने सर्वांनाच धक्का बसला. दरम्यान त्यांना कोणत्याही क्षणी सीबीआयकडून अटक होऊ शकते.
या पत्रकार परिषदेत बोलताना पी चिदंबरम म्हणाले की, “मी कोणताही गुन्हा केलेला नाही. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप हे खोटे आहेत. माझ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोपपत्र दाखल नाही. मी आणि माझ्या मुलाने कोणताही गु्न्हा केलेला नाही.” असे ते म्हणाले.
आयएनएक्स घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश रंजन गोगोई शुक्रवारी सुनावणी करणार आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने त्यांची अडचण वाढल्याचे दिसत आहे. दरम्यान ईडी आणि सीबीआयने चिदंबरम यांना नव्याने लुकआउट नोटीस जारी करत भारताबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे.