बहुजननामा ऑनलाईन – केंद्रीय अन्वेषण विभागाने आयएनएक्स मीडिया प्रकरणात कारवाई करत माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना अटक केली आहे. चिदंबरम यांना बुधवारी (ता.२१) रात्री अटक करण्यात आली आणि गुरुवारी (ता.२२) त्यांना दिल्लीतील रूझ एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. सीबीआयच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितले की, आयएनएक्स मीडियाने विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या (एफआयपीबी) नियमांचे उल्लंघन करुन चुकीच्या पद्धतीने थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) वसुल केली आहे. त्यानंतर चिदंबरम यांच्यामुळे आयएनएक्स मीडियालाही चुकीच्या पद्धतीने फायदा झाला.
तर सीबीआयच्या वतीने आरोप करण्यात आला आहे की, पी. चिदंबरम यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत कार्ती चिदंबरमशी संबंधित कंपन्यांना सुमारे ५ दशलक्ष डॉलर्स दिले. यावेळी बोलताना मेहता म्हणाले की, एखाद्या व्यक्तीने गप्प राहणे हा त्याचा अधिकार असला तरी जाणुनबुजुन प्रश्नांची उत्तरे देणे टाळणे योग्य नाही.
चिदंबरम चौकशीदरम्यान मौन बाळगतात कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी टाळाटाळ करतात, म्हणून रिमांडशिवाय ही चौकशी पुर्ण होऊ शकणार नाही. याप्रंसगी सीबीआयने पी. चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडून पाच दिवसांचा रिमांड मागितला आहे.या पाच दिवसांत सीबीआय पी. चिदंबरम यांना अन्य साक्षीदार आणि खटल्याशी संबंधित लोकांशी ओळख करुन देण्यात येईल.