कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – कोल्हापूर येथे अतिक्रमण काढल्याने संतापून काहींनी संजय पतंगे यांचे घर पेटवून दिले आहे. ही घटना गारगोटी येथील पोलीस लाईन्स भागात घडली असून जमावाने पतंगे यांची खासगी गाडीपण पेटवून दिली आहे. या घटनेमुळे गारगोटी भागात बंदोबस्त केला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून या प्रकरणात संशयित सुभाष देसाई याला ताब्यात घेतले असल्याचे अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी सांगितले. भुदरगड पोलीस कर्मचारी निवासस्थानाच्या आवारात सुभाष देसाई याने अतिक्रमण करत दुकानाचा गाळा काढला असताना हे अतिक्रमण संजय पतंगे यांनी काढले. संशयित सुभाष देसाई याने याचाच राग आल्याने कर्मचाऱ्यांना धमकी दिली. नंतर त्याने रॉकेलचा कॅन आणून ठेवला. मंगळवारी रात्री त्याने पोलीस कर्मचारी वसाहतीत राहणारे निरीक्षक पतंगे यांच्या मोटारीवर रॉकेल ओतून पेटवल्यावर ती जाळून खाक झाली. त्याने पतंगे यांच्या घरावरही रॉकेल ओतून पेटवून दिल्यामुळे घराच्या हॉलच्या काचा फुटल्या. तसेच घरातील फर्निचरचेही मोठे नुकसान झाले.
दरम्यान पतंगे यांनी देसाईला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. नंतर मात्र बुधवारी सकाळी महागाव येथून त्याच्या बहिणीच्या घरातून त्याला ताब्यात घेतले. देसाई गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्या विरोधात नागरिकांनी तक्रारी दिल्यावर कारवाई केली जाईल, असे अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी सांगितले.