बारामती : बहुजननामा ऑनलाईन – शरद पवार आणि क्रिकेट यांचे संबंध जुने असून राजकारण आणि क्रिकेट या दोन गोष्टी पवारांच्या अगदी जवळच्या आहेत. त्यामुळेच क्रिकेटच्या मैदानावर शरद पवार कोणत्या ना कोणत्यातरी रूपात दिसत असतात. पण बारामतीच्या मैदानात शरद पवार प्रथमच दिसले असून बारामती हे शरद पवारांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजच बारामतीच्या बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर पहिला रणजी सामना खेळला गेला.
बारामतीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमवर आज महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या रणजी सामन्याचे उद्घाटन करताना समाधान वाटले. प्रथम श्रेणी क्रिकेट सामने देशांत सर्वदूर आयोजित होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे.#baramati #Cricket #RanjiTrophy pic.twitter.com/LOljSIMI8V
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 12, 2020
बारामतीच्या क्रिकेटच्या मैदानावर पहिला रणजी सामना पाहण्यासाठी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार याही उपस्थित होत्या. या मैदानावर महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड हा सामना होत असून मागील वर्षी डिसेंबर महिन्यात बीसीसीआयच्या समितीने मैदानाची पाहणी केली होती. तसेच यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाला प्रथमश्रेणी सामन्यांचा दर्जाही दिला गेला.
सामना सुरु होण्याआधी पवार यांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी पवारांसह फोटोही काढले. शरद पवार यांनी स्वतः हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून प्रथमश्रेणी क्रिकेट सामने देशात सर्वदूर आयोजित होण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे, असे त्यांनी त्या फोटोसह म्हटले आहे.