नाशिकः पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यातील कोरोनाची प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. असे असले तरी सर्वांना कायमस्वरुपी सुरक्षाकवच मिळावे यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे. या लसीकरणातून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. 18) झालेल्या बैठकीत माढरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डॉ. प्रकाश नांदापूरकर आदी उपस्थित होते.
मांढरे म्हणाले की, लोकप्रतिनिधी आणि सरकारी यंत्रणांच्या समन्वयातून आणि नागरी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश मिळाले आहे. लसीकरणाच्या जनजागृतीसाठी शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संघटना, आरोग्य यंत्रणा, वाहतूक विभाग, कलाकार, नाट्यप्रेमी आदींची मदत घेतली जाणार आहे.
याबाबत जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड म्हणाल्या की, लस आल्यानंतर अगोदर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी आदीचे लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.