पुणे : बहुजननामा ऑनलाईन – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील शिरूर-दौंडसाठी एक मोठी भेट दिली आहे. तर या तालुक्यातील केडगाव-चौफुला या राष्ट्रीय महामार्ग (NH) 548 नंबरच्या रस्त्याच्या दरम्यान असलेल्या छोट्या पुलांसाठी तब्बल २६ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीला गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. अशी माहिती नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
मुंबई-चाकण-शिक्रापूर-जामखेड हा गेल्या पंचवार्षिकमध्ये NH,548-D नंबरने घोषीत करण्यात आला होता. यानंतर तळेगाव दाभाडे ते शिक्रापूर रस्ता सहापदरी करण्यासाठी तसेच शिक्रापूर ते केडगाव चौफुला रस्ता चारपदरी करण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने जवळपास १८०० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यात आला होता. तर यानंतर नॅशनल हायवे प्राधिकरणाचे सचिव सु. दे. चिटणीस, राजीव सिंग व डी. ओ. तावडे आदी स्थानिक पातळीवरील माहिती लोकप्रतिनिधींकडून संकलन करीत होते. तर आता याच संपूर्ण महामार्गांवरील छोट्या पुलांसाठी २६ कोटी रुपयांच्या कामांसाठीचा निधी मंजूर केल्याची माहिती मंत्री गडकरी यांनी दिली आहे.
या राष्ट्रीय महामार्गावरील स्थानिकांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिल्लीला भेट देत होते. तर यावरूनच मंत्री नितीन गडकरी यांनी नॅशनल हायवे विभागाचे महाराष्ट्र राज्य मुख्य अभियंता विनय देशपांडे यांच्याकरवी ४६ कोटींचे अंदाजपत्रक रस्ते व वाहतूक मंत्रालयाला सादर केले होते. यावरून या कार्याची निविदा प्रक्रिया १४ सप्टेंबर २०१९ मध्ये प्रारंभ करून निविदा प्रक्रियेत १७ ठेकेदारांनी भाग घेतल्यानंतर राजेंद्रसिंह भांबू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड जयपूर यांच्या कमी दराच्या निविदेने त्यांना तत्काळ कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया राबवली गेली होती.
दरम्यान, या सर्व कामातील जामखेड रस्त्याच्या अलिकडील (शिरूर-पुणे येथील) भाग असलेले न्हावरे-तांदळी-आढळगाव या ४९ किलोमीटर रस्त्याचे १० मीटर रुंदीचे कॉंक्रिटीकरणाचे ३०० कोटी रुपयांचे काम या अगोदरच झाले आहे. तसेच तळेगाव ढमढेरेमार्गे बीडकडे जाणाऱ्या वाहनांना एक चांगला आणि सोयीचा मार्ग लवकर उपलब्ध होईल, असे व्यवस्थापन केले आहे. यावरूनच २ टप्प्यातील पहिल्या टप्प्यात रुंदीकरणासाठी ४६ कोटींची मंजुरी गडकरी यांनी दिली होती. आता याच संपूर्ण महामार्गांवरील छोट्या पुलांसाठी २६ कोटी रुपयांच्या कामांसाठीचा निधी मंजूर केल्याची माहिती गडकरी यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे.