नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील रस्ते बांधणीसाठी तब्बल २,७८० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. (nitin gadkari on road works in maharashtra) देशाच्या विकासासाठी पायाभूत आणि रस्ते विकास यांचा वाटा महत्त्वाचा आहे या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात नितीन गडकरी यांनी एकामागून एक ट्विट करून माहिती दिली.
ट्विट करताना नितीन गडकरी यांनी ‘प्रगती का हायवे’ असा हॅशटॅग वापरला आहे. महाराष्ट्रातील या कामांसाठी २७८० कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरण करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीसंदर्भात माहिती दिली. तसेच, महाराष्ट्रातील रस्ते कामांपैकी कोकणवासियांसाठी गडकरींनी खास भेट दिली आहे. चिपळूणच नाही तर जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग ७५३ जेच्या विस्तारीकरणासाठी २५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे नितीन गडकरींनी ट्विटरवरून सांगितले. सदर रस्ता दोन किंवा चार पदरी करण्यात येणार आहे. गडचिरोली तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ३५३ सीवरील २६२ किमी ते ३२१ किमीच्या अंतरामध्ये १६ लहान मोठे पूल बांधण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. यासाठी २८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी १८८ कोटी ६९ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, हा पूल राष्ट्रीय महामार्ग ६३ चा भाग असेल. नागपूरमध्ये आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ कॅम्पस असा उड्डाणपूल, राष्ट्रीय महामार्ग ५३ वर वाडी/एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उड्डाण पूल बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी एकूण ४७८ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमगाव-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग ५४३ साठी २३९ कोटी रुपये, राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफच्या परळी गंगाखेडदरम्यानच्या कामासाठी २२२ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग ७५२ आयवरील वातूर ते चारथाना दरम्यानच्या रस्त्याच्या काम करण्यासाठी २२८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच तिरोरा ते गोंदियादरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ७५३ च्या दोन पदरी रस्ते बांधकामासाठी २८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तारीरी- गगनबावडा-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्ग १६६ जीवरील रस्त्याच्या कामासाठी १६७ कोटी रुपये, तिरोरा गोंदिया राज्य महामार्गाच्या गांधकामासाठी २८८.१३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, राष्ट्रीय महामार्ग ७५३ अंतर्गत २८.२ किमीचा नवा रस्ता बांधण्यात येणार आहे.