सातारा : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभेच्या तोंडावर आज भाजपमध्ये अनेक आमदारांनी प्रवेश केला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीन आमदारांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये साताऱ्याच्या शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केले आहे. शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी या जागेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,या जागेसाठी आमच्याकडे आतापर्यंत तीन अर्ज आले असून हि जागा १०० टक्के आम्हीच जिंकणार असून त्याविषयी कुणाच्याही मनात शंका नाही. यावेळी शिवेंद्रराजेंच्या प्रवेशावर बोलताना ते म्हणाले की, संसदेच्या अधिवेशनानंतर आपण चर्चा करू असे आश्वासन मी त्यांना दिले होते मात्र त्यांनी त्याआधीच आपला निर्णय घेतला. त्याचबरोबर त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा उदयनराजेंशी काहीही संबंध नसून त्यांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे देखील स्पष्टीकरण शरद पवारांनी दिले.
‘त्यांच्या’ हृदयाची साइज बघावी लागेल !
सोडून जाणाऱ्या अनेक आमदारांनी शरद पवार आमची श्रद्धा असल्याचे म्हटले. त्याचबरोबर ते खय्याम आमच्या हृदयात राहतील असेदेखील म्हटले. त्यावर भाष्य करताना पवारांनी ‘त्यांच्या हृदयाची साइज तपासावी लागेल असे म्हणत त्यांना टोमणा मारला.
दरम्यान, आमदारांच्या पक्षप्रवेशावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पवारांनी हे सरकार सूडबुद्धीने काम करत असून या आमदारांना धमकावून पक्षात प्रवेश करण्यास भाग पाडत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.