नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक भोंदू बाबा लोकांच्या श्रद्धेशी खेळत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करतात, असेच एक भोंदूगिरीचे प्रकरण उघडकीस आले आहे. स्वतःचा ‘कल्की भगवान’ म्हणून उल्लेख करणाऱ्या विजय कुमार नायडू यांच्यावर आयकर विभागाने छापा टाकत, करोडोंची रक्कम जप्त केली आहे, विजय कुमार नायडू आणि त्याचा मुलगा कृष्णा यांच्या तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील आश्रमावरदेखील आयकर विभाग छापा टाकण्याच्या तयारीत आहे.
आयकर विभागाने आतापर्यंत चेन्नई, हैद्राबाद, बँगलोर, चित्तूर, आणि कुप्पम येथील आश्रमांवर टाकलेल्या छाप्यात ४४ कोटी रुपयांची रक्कम तसेच २० कोटी अमेरिकन डॉलर आणि ९० किलो सोने जप्त करण्यात आले आहे. तथाकथित कल्की भगवान आणि त्यांच्या मुलाने आंध्रप्रदेशासोबतच इतर राज्यांत आपल्या आश्रमाचे जाळे पसरवले आहे, त्या ठिकाणी अनेक श्रीमंत आणि परदेशी लोक येत असतात. महाराजांचे दर्शन घेण्यासाठी ५ हजार रुपये, तर विशेष दर्शन घेण्यासाठी २५ हजार रुपये द्यावे लागतात.
दरम्यान नायडू उर्फ कल्की एलआयसीमध्ये क्लार्क ची नोकरी करत होता. त्यानंतर त्याने एक शिक्षण संस्था सुरु केली, परंतु त्यामुळे तो तोट्यात आल्याने , त्याने पळ काढला आणि त्यानंतर १९८९ मध्ये चितूर येथे येऊन आपण विष्णूचा दहावा अवतार म्हणजेच कल्की असल्याचे म्हणत हा लोकांना लुबाडण्याचा व्यवसाय सुरु केला. दरम्यान कृष्णा यांच्यावर २०१० मध्ये जमिनी हडप केल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. तसेच २००८ मध्ये चितूर येथील आश्रमात झालेल्या गोंधळामुळे पाच लोकांचा मृत्यू तसेच अनेक लोक जखमी झाले होते. त्यामुळे ते आश्रम बंद करण्यात आले होते.
visit : bahujannama.com