मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नागपूरमधील एका ठिकाणी एक महिला देह व्यापार चालवत होती. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी कारवाई करायची सोडून त्यांनी त्या महिलेकडे देह व्यापार सुरु ठेवण्यासाठी ३५ हजार रुपये मागितले. विशेष म्हणजे या दोन पोलिसांनी शरीरसुखासाठी तीन वेश्यांचीही मागणी देह व्यापार चालवणाऱ्या महिलेकडे केली.
त्या दोन पोलिसांवर सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेकडून तीन वेश्या आणि ३५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दामोदर राजुरकर आणि पोलीस हवालदार शीतलाप्रसाद मिश्रा या दोघांना अटक केली आहे. हे दोघंही समाजिक सुरक्षा पथकात कार्यरत होते. या धक्कादायक प्रकारामुळे नागपूर शहरातील पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
या दोन्ही पोलिसांना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. तसेच पोलीस दलातही एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या गोष्टी थांबवण्यासाठी नागपूर पोलिसांकडून अनेक प्रयत्न होत आहेत. परंतु हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.